
संगमनेर –
28 ऑगस्ट 2025
संगमनेरचे नववर्चित आमदार अमोल खताळ यांच्यावर संगमनेरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची खळबळजनक घटना आज 28 ऑगस्ट 2025 रोजी घडलेली आहे.
गणेशोत्सवाच्या धामधुमीत झालेल्या या घटनेमुळे शहरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान या घटनेचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
राजस्थान युवक मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभावेळी ही घटना घडली. मालपाणी लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमात आमदार खताळ उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते प्रेक्षकांशी हस्तांदोलन करत असताना, खांडगाव येथील एका व्यक्तीने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती समजते. हा प्रकार आमदार खताळ यांच्या वैयक्तिक सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान राखून हल्लेखोराला पकडले. त्याच वेळी मालपाणी उद्योग समूहाचे सुरक्षा रक्षकही मदतीला धावले. हल्लेखोराला तातडीने ताब्यात घेण्यात आले.
या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच जमाव वाढल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरातील वातावरण तापले असून, कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सध्या संगमनेरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचे शहरावर बारीक लक्ष आहे. दरम्यान पोलिसांनी हल्लेखोराची निपक्षपणे कसून चौकशी करून वस्तुस्थिती आणि सत्य समोर आणण्याची मागणी होत असून आमदार खताळ यांच्या कार्यालयासमोर आणि मालपाणी लॉन्स येथे संगमनेरकरांनी घटनेचा निषेध नोंदवत मोठी गर्दी केली आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.















