
राहाता, ०१ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार’ यंदा राहाता तालुक्यातील लोणी येथे कार्यरत असलेले तलाठी देवकर मंजुश्री यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट कार्य आणि गावपातळीवरील प्रशासकीय सेवेतील योगदानाबद्दल देण्यात आला आहे.
०१ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित कुंदन लॉन येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जलसंपदा मंत्री व अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले, तर अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी श्री. बाळासाहेब कोळेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी चे माननीय श्री गोरख गाडीळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात देवकर यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मंजुश्री देवकर यांनी गावातील महसूल प्रशासनाशी संबंधित कामे तत्परतेने आणि पारदर्शकपणे पार पाडली. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यास सुलभता आली. विशेषत: जमीन महसूल संहितेअंतर्गत नोंदणीपत्रके आणि रजिस्टर अद्ययावत ठेवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या समर्पित सेवेमुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळाली आहे.
जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी देवकर यांच्या कार्याला प्रेरणादायी ठरवताना सांगितले, “मंजुश्री देवकर यांनी गावपातळीवरील प्रशासनाला नवीन उंची दिली आहे. त्यांचा हा सन्मान संपूर्ण महसूल विभागासाठी अभिमानास्पद आहे.” अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर साहेब यांनीही त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत भविष्यातही असेच योगदान देण्याचे आवाहन केले.
मंजुश्री देवकर यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणा आहे. गावातील प्रत्येक नागरिकाला शासकीय सेवांचा लाभ मिळावा, यासाठी मी यापुढेही प्रयत्न करेन.” या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळाले असून, इतर तलाठ्यांसाठीही ते एक प्रेरणास्रोत ठरले आहेत.
हा पुरस्कार महाराष्ट्रातील ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी दरवर्षी प्रदान केला जातो. यंदाच्या पुरस्काराने राहाता तालुक्याचा गौरव वाढला आहे.















